स्टेशनबाहेर पडून घरापाशी आलो. बिल्डिंगच्या खाली एक मिनिट शांत उभा राहिलो. नेहमीसारखंच दिवसाच्या अफाट वेगानं गरगरल्यासारखं झालं होतं. दिवसभरातले दबक्या संतापाचे, धुसफुशीचे, अस्तित्वहीनतेचे क्षण डोळ्यांसमोर येत होते. काय माझं नाव? काय माझी ओळख? काय माझे छंद? काय माझी अभिरुची? कोण मी? स्वतःविषयी सारी उमेद, आत्मविश्वास गर्दीच्या पावलांखाली चिरडून गेली होती.
घरातून बाहेर पडलो आणि हजारातला एक होऊन चाकरीच्या दिशेने चालू लागलो. रस्त्यावरच्या एका डबक्यातून एक कार भरधाव वेगानं निघून गेली आणि माझ्या पॅंटवर त्या चिखलाच्या पाण्याचे काही शिंतोडे उडवून गेली! काही कळायच्या आत पुढच्या वळणावरून दिसेनाशीही झाली. ना दाद; ना फिर्याद! तसाच रेटून चालत राहिलो. संतापाच्या तंद्रीत कुठल्या तरी वाहनासमोर जरासा रेंगाळलो, तोच त्या कारनं कर्कश हॉर्नचा आवाज, अंगावर कुणी वसकन् ओरडावं, तसा फेकून दिला. दचकून थोडा बाजूला झालो. कारमालकानं जाता जाता तुच्छतेनं माझ्याकडं पाहिलं. "कहॉं कहॉं से आ जाते है साले!' असा त्याचा शेरा कानावर आदळला. पायांना गती दिली आणि वर भरलेल्या आभाळाकडं पाहत, कुठल्याही क्षणी कोसळेल, अशा पावसाची प्रार्थना करत स्टेशनकडे निघालो.
स्टेशनवर नेहमीसारखीच हीऽऽ गर्दी! "डिस्कव्हरी'वर वाळवीची वारुळं दाखवली होती, ती आठवली. एकमेकांना खेटलेली, चिकटलेली, बुजबुजलेली ती वस्ती! आम्हीही तसलेच. स्वतःचंच आयुष्य कुरतडत बसलेल्या वाळव्या. ट्रेन लेट होती. ती तिची वेळ झाली, तेव्हा आली आणि मला पोटात भरून निघाली. आजूबाजूला माणसंच माणसं. छोटे, मोठे, कर्कश, किनरे, भसाडे आवाज. शिंका, उचक्या, खोकले, मानेवर आदळणारे श्वासोच्छ्वास. माझे हात-पाय, डोकं, शरीर त्या गर्दीच्या स्वाधीन. तशातच पाऊसमहाराजांचं आगमन झालं आणि दरवाजाजवळ उभे असलेले आम्ही त्या थेंबांनी भिजू लागलो. कपड्यांआत घामाचा ओलावा नि बाहेर पावसाचा.
ईप्सित-स्टेशनावर बाहेर फेकला गेलो आणि छत्री उघडून ऑटो शोधायला लागलो. माझ्या एरियात येण्याचा ऑटोवाल्याला "मूड' नव्हता. त्याच्या हाता-पाया पडून, जास्त पैशाची लालूच दाखवून एकदाच्या त्याच्या रिक्षेत बसलो आणि त्याच्या गुर्मीदार उपकाराचं ओझं पाठीवर घेऊन ऑफिसात पोचलो.
आल्यावर बॉसच्या केबिनमध्ये उशिरा येणे, कामातली इफिशिअन्सी, पेंडिंग जॉबविषयी खेटरे खाणे इत्यादी बौद्धिकं, परिसंवाद उरकून अनेक खुर्च्यांपैकी एका खुर्चीत बसून कामाला प्रारंभ केला. कॉम्प्युटर बडवला. फायली उरकल्या. भेटायला आलेल्या क्लाएंट्सचे प्रश्न, खोचक तिरकस शेरे, संताप, समजावणी हे सोपस्कार उरकले. मध्ये डब्यातली गार भाजी-पोळी संपवली. चहाचे कप रिचवले. ऑफिसमधल्या दिवसाचा रकाना भरला आणि पुन्हा एकदा अफाट गर्दीतला एक कण होऊन ट्रेनमधून घरी निघालो. स्टेशनबाहेर पडून घरापाशी आलो. बिल्डिंगच्या खाली एक मिनिट शांत उभा राहिलो. नेहमीसारखंच दिवसाच्या अफाट वेगानं गरगरल्यासारखं झालं होतं. दिवसभरातले दबक्या संतापाचे, धुसफुशीचे, अस्तित्वहीनतेचे क्षण डोळ्यांसमोर येत होते. काय माझं नाव? काय माझी ओळख? काय माझे छंद? काय माझी अभिरुची? कोण मी? स्वतःविषयी सारी उमेद, आत्मविश्वास गर्दीच्या पावलांखाली चिरडून गेली होती.
एक बधीर अनोळखी शरीर, अस्तित्व घेऊन दाराची बेल वाजवली आणि दार उघडताक्षणी "बाबा, बाबा' करत चिमुकलीचे रेशमी हात गळ्यात पडले. आत काहीतरी थरारलं. काहीतरी सजीव झालं. "बाबा, आज की नाही शाळेत काय झालं..', "बाबा, मला खांद्यावर बसव', "आमच्या टीचरनी निबंध सांगितलाय, तो दे ना लिहून...', आणि हे सारं तृप्त कौतुकानं पाहणारे माझ्या बायकोचे डोळे!
"अगं थांब पिलू, बाबा आत्ताच आलाय ना ऑफिसमधून...दमलाय बघ किती...त्याला पाणी दे आधी!' अशी तिची लगबग. हातात अलगद आलेला गरमागरम चहाचा कप! क्षणांच्या मागे एकदम एक मंद, सुरेल पार्श्वसंगीत सुरू झालं. बायकोचं लडिवाळ आर्जव..."अहो, आ आठवड्यात वेळ काढा हं...आई-बाबा म्हणत होते बरेच दिवसांत जावईबापू आले नाहीत जेवायला!'
मुलीला निबंध लिहायला चार वाक्यं सांगितली तर "आई ।।, बाबा कसला ग्रेट आहे. दहा मिनिटांत निबंध दिला,' असं सर्टिफिकेट हातात आलं! ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, ती चूल पेटली आणि अन्नब्रह्माची ती ऊब डोळ्यांवर छान पेंग आणू लागली! आणि रात्रीच्या अंधारात पाठीवर अलगद मायेचा हात फिरला, "किती धावपळ करतोस रे आमच्यासाठी...दमलं का माझं बछडं!!'
थकल्या शरीराला पुढल्या दिवसासाठी बळ आलं. माझी "गरज' असलेले हे जिवलग, माझे आप्त, माझे सुहृद! माझी "ओळख' असलेली ही माझी माणसं, माझं जग, माझी आकाशगंगा! अंतरात लीन-दीन, ओळखशून्य, मावळलेला सूर्य पुन्हा पूर्वेकडं झेपावला...एका नव्या दिवसाच्या प्रारंभासाठी!
कलोजस
तो टीव्हीवर असतो
तेव्हा कोणीच नसतो,
अस्तित्वाच्या फांदीला लोंबणारा
चुरगळलेला मांसाचा
कंटाळलेल्या अस्थीचा
एक सांगाडा घामेजलेला,
गर्दीची गती अंगावर घेऊन
वहात जातो निर्जीवपणाने
कुर्ल्याकडे,
सांडपाण्यातील किड्यासारखा,
व्यक्तित्वहीन.
पण कुर्ल्यातील सिंगल रूममध्ये येऊन
चटईवर, चौपाईवर मरून
तो जेव्हा पुन्हा उठून बसतो
दिवेलागणीच्या प्रकाशात,
तेव्हा तो झालेला असतो
एक प्रचंड कलोजस
बाप
भाऊ
नवरा...
पेटलेल्या चुलीचा स्वामी,
छताला टांगलेल्या दिव्याचा
रखवालदार,
अस्तित्वाचे अठरा लगाम
सांभाळणारा,
अठरा सोनेरी अश्वांच्या पाठीवर
आसूड ओढीत
आपल्या ग्रहमालेचा परिवार
जीवनाच्या अंतराळात
मिरवीत नेणारा एक
साक्षात् सूर्यनारायण!
- कुसुमाग्रज
("प्रवासी पक्षी' या काव्यसंग्रहातून)
वाक्यरचना संदीप खरे
स्त्रोत http://www.marathiradio.com/node/46